---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात विविध भागात एक शेतकरी, दोन तरुणांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत असल्याने तणावात असलेल्या राजू शंकर तळेकर (५५, रा. देव्हारी, ता. जळगाव) या शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. राजू तळेकर यांचे देव्हारी शिवारात शेत असून त्यांनी कापसाची लागवड केली आहे. यंदा अतिपावसामुळे पिकांतर परिणाम होत असन अगोदरच विविध कार्यकारी सोसायटी व खासगी असे सात आठ लाख रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे. त्यामुळे ते तणावात असायचे. याच तणावात त्यांनी शेतात विष प्राशन केले, अशी माहिती त्यांचा मुलगा अनिल तळेकर यांनी दिली. तळेकर यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
राहत्या घरामध्ये गळफास
राहत्या घरामध्ये गळफास घेऊन सागर मधुकर चौधरी (३२, रा. श्रीराम चौक) यांनी आत्महत्या केली. सागर चौधरी यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जेवणासाठी बोलवायला गेले अन् दिसला मुलाचा मृतदेह
घरामध्ये बहीण स्वयंपाक करीत असताना वरील १ मजल्यावर जाऊन रामकृष्ण छबू वैराट (२७, रा. इच्छादेवी चौक) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामकृष्ण वैराट हा तरुण मजुरी काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. ५ सप्टेंबर रोजी रात्री तो घराच्या वरील मजल्यावर गेला व गळफास घेतला. काही वेळाने त्याचे वडील त्याला जेवणासाठी बोलवायला गेले असता मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
त्यावेळी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.