जळगाव : यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे गटारीत स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या स्त्री जातीचे अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले आहे.
यावल तालुक्यातील सावखेडा सिम गावात २५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील एका व्यक्तीस कुणीतरी अपुर्ण दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकुन दिल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी गटारीतून हा अर्भक बाहेर काढून गावातील पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना सांगितले.
पोलीस पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात माहिती कळविल्यावर पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून तात्काळ घटनेचे गांभींय लक्षात घेत सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व हेकॉ राजेन्द्र पवार यांनी घटनास्थळी भेट देत मृत अर्भकास पंचमाना करीत ताब्यात घेत, वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठविले.
दरम्यान, हा प्रकार पाहण्यासाठी सावखेडा सिम गावातील ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती. सदर अर्भक स्त्री जातीचे असून ते पाच ते सहा महिन्यांचे असावे असा अंदाज ग्रामस्थांकडून काढला जात आहे. सदरचे असे हे घृणास्पद कृत्य करणार्या नराधमास किंवा त्या अज्ञात महिलेस शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहे.