भुसावळात दोन आमदारांसह माजी आमदारांमध्ये होणार चुरशीची फाईट

भुसावळ : भुसावळातील कृउबा निवडणुकीसाठी उन्हाळ्यात आखाडा तापला असून माजी आमदार संतोष चौधरींचे कृउबावर वर्चस्व असले तरी कृउबा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा आमदार संजय सावकारे यांनी डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. यंदा ही निवडणूक माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी व विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलमध्ये रंगणार असलीतरी सोमवारी शहर भेटीवर आलेल्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर चौधरी-खडसेंमध्ये दिलजमाई झाल्यानंतर दोघे नेते आता एकत्र येवून ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आजी-माजी आमदारांविरोधात भाजपाचा समोरा-समोर मुकाबला होण्याचे संकेत आहेत. या निवडणुकीतील नेत्यांना मिळालेले यश-अपयश हे आगामी पालिका निवडणुकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

कृउबावर चौधरींचे वर्चस्व
भुसावळ बाजार समितीची निवडणूक ऑक्टोंबर 2015 मध्ये झाल्यानंतर या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरींच्या पॅनलला 12 तर आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या. यंदाच्या निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहिर होताच आता राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांचे स्वतंत्र पॅनल राहण्याची शक्यता होती मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित नेत्यांची बैठक होवून त्यात दोघा नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडी विरोधात भाजपा अशी लढत होणार आहे. बाजार समितीची निवडणूक ही पालिका निवडणूकीसाठीची लिटमट टेस्ट ठरणार आहे.

या जागांसाठी होणार निवडणूक
बाजार समितीमध्ये 18 जागा असून यातील 11 जागा सोसायटी मतदार संघाच्या आहेत. यातील सात जागा सर्वसाधारण, दोन महिला राखीव, एक ओबीसी, एक अनूसुचित जाती जमाती अशा असून ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागा असून त्यात दोन सर्वसाधारण, एक आर्थिक दुर्बल घटक व एक अनुसूचित जाती अशा असतील. व्यापारी संचालक गटातून दोन तर हमाल मापाडी गटातून एक जागा आहे.

भाजपा उतरणार ताकदिनिशी मैदानात
निवडणुकीसाठी आमदार संजय सावकारे गटाची नुकतीच पहिली बैठक झाली व त्यात गावनिहाय उमेदवारांची चाचणी करण्यात आली. कोणत्या गावांतून कोणत्या मतदार संघातून उमेदवाराला संधी देण्यात येईल, याबाबत प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याची माहिती आहे. खडसेंसह चौधरींना टक्कर देण्यासाठी भाजपाने सर्वच जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे.