मध्यप्रदेश : मध्यप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांने प्राचार्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात प्राचार्या ८० टक्के भाजल्यात. इंदुर बीएम महाविद्यालयात सोमवारी ही घटना घडली.
सूत्रानुसार, आशुतोष श्रीवास्तव या विद्यार्थ्यानं हा धक्कादायक प्रकार घडवून आणला आहे. श्रीवास्तवला कॉलेज सोडूनही त्याची मार्कशीट मिळाली नव्हती. त्यामुळे ती मार्कशीट मिळवण्यासाठी तो कॉलेजमध्ये आला होता. मात्र सोमवारी देखील त्याला मार्कशीट मिळाली नाही.
याचा आशुतोषला खूप राग आला. त्याने थेट पेट्रोल आणले आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या अंगावर फेकले. तसेच नंतर त्यांना पेटवून दिले. ही घटना घडली तेव्हा प्राचार्या स्वत: जीव वाचवण्यासाठी पळू लागल्या. त्या पळत असताना तेथील काही शिक्षकांनाही आगीची झळ बसली. शिक्षकांनी कशीतरी आग विझवली आणि प्राचार्यांना दवाखाण्यात दाखलं केलं आहे.
या घटनेत विद्यार्थी देखील थोडा होरपळला होता. प्राचार्यांना जाळल्यावर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तितक्यात तेथे पोलीस आले आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी विद्यार्थ्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.