ट्रक चालकांना लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : महामार्गावर ट्रक अडवत ट्रक चालकांना मारहाण करून लुटणार्‍या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून जळगावच्या गेंदालाल मिल भागातील पाच गुन्हेगारांना बुधवारी अटक करण्यात आली. आरोपींना चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या लूट प्रकरणी चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चोपडा पोलिसात दाखल होता गुन्हा
चोपडा शहर हद्दीत बुधवारी रात्री एक वाजता शिरपूर बायपास रोडवरील हॉटेल सुनीताजवळ स्कूटी व चारचाकीतून आलेल्या आरोपींनी ट्रक चालक सुरेश प्रतापसिंग चव्हाण (बेडीपुरा टेकडीजवळ, मिर्झापूर, ता.कसरावत, मध्यप्रदेश) यांना मारहाण करीत त्यांच्याकडील दिड हजारांची रोकड व तीन हजारांचा मोबाईल व ट्रकची चावी हिसकावून पोबारा केला होता. तक्रारदार हे एमआयडीसीतून जुन्या बॅटर्‍या घेवून इंदौरकडे निघाल्यानंतर हा प्रकार घडल्यानंतर त्यांना पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली होती.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, अकरम शेख, महेश महाजन, परेश महाजन, रवींद्र पाटील, अविनाश देवरे, दीपक शिंदे तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक विसावे, शेषराव थोरे, प्रमोद पाटील, संतोष पारधी, प्रमोद पवार यांनी पाच संशयीतांना अटक केली आहे.

या आरोपींना अटक
या प्रकरणी गेंदालाल मिल भागातून बुधवारी नवाब खान गुलाब खान (32, शिवाजीनगर, जळगाव), शाहरुख खान शाबीर खान (20, गेंदालाल मिल जळगाव), सौरभ भुवनेश्वर लांजेवार (35, रायपूर, छत्तीसगड), जावेद खान नसीर खान (32, गेंदालाल मिल, जळगाव), प्रदीप राधेश्याम रायपुरीया (34, गेंदालाल मिल, जळगाव) यांना अटक करण्यात आली. संशयीतांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यांना चोपडा शहर पोलीस ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.