Kojagiri Purnima : तळोद्यात दिसली महाराष्ट्राची संस्कृती अन् परंपरेची झलक

---Advertisement---

 

तळोदा : शहरातील शंकर काशीराम नगर परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘आपली परंपरा, आपला अभिमान’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेची झलक दिसून आली.

कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यांनी उजळलेल्या रात्री शंकर काशीराम नगर परिसरात उत्साह, आनंद आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या निमित्ताने येथील महिलांनी एक आगळीवेगळी कल्पना राबवली “घरातील जुन्या पारंपरिक कामांचे देखावे साकारून आपल्या संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवणे.”

महिलांनी नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने आणि जुन्या काळातील वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीचा झगमगता वारसा साकारला. त्यांनी गहू पांखरणे, दळणे, दही करणे, रांगोळी काढणे, तुळशीची पूजा करणे, चुलीवर स्वयंपाक करणे, विठ्ठल पुजन करणे अशा घरगुती कामांचे देखावे सादर केले. या सादरीकरणातून प्रेक्षकांना जुन्या काळातील स्त्रियांच्या कष्टमय पण संस्कारमय जीवनाची झलक अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमात ‘आपली परंपरा आपला अभिमान’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धा घेण्यात आली होती. प्रत्येक सहभागी महिलेने आपल्या पोशाख, सादरीकरण आणि शैलीतून महाराष्ट्राच्या परंपरेची झलक सुंदरपणे सादर केली.

चांदण्यांच्या प्रकाशात दुधाचा शिरा, गरम दूध आणि हास्य-विनोदांच्या गप्पा यांनी हा सोहळा अधिकच रंगतदार झाला. महिलांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

एकंदरीत,काशिराम शंकर नगरमधील कोजागिरी पौर्णिमेचा हा सोहळा फक्त चंद्रप्रकाशाचा नव्हे, तर संस्कृती, सौंदर्य आणि स्त्रीशक्तीच्या तेजाने उजळलेला ठरला!

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सपना सजनकार, शितल चिंचोले, निरुपमा कर्णकार,रीना पटेल,रुचना चौधरी, लक्ष्मी सजनकार,रत्ना पटेल, कविता मराठे,छाया कुंवर,सोनल माळी यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---