सरत्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांना दिलासा देणाऱ्या सोन्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागाईचा झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ₹800 ची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती स्थिर असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या घसरणीनंतर कोणताही बदल झालेला नाही.
सोन्याचा तेजीचा प्रवास
31 डिसेंबर रोजी सोन्याचा दर ₹440 ने घसरला होता. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी रोजी ₹440 आणि त्यानंतर 2 जानेवारी रोजी आणखी ₹330 ने वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹71,950 प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹78,480 प्रति 10 ग्रॅम आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोन्याचा दर ₹77,079, 23 कॅरेट ₹76,770, 22 कॅरेट ₹70,604, 18 कॅरेट ₹57,809, आणि 14 कॅरेट ₹45,091 प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी स्थिर, किंमतीत बदल नाही
चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. डिसेंबरच्या शेवटी ₹1,900 ने स्वस्त झाल्यानंतर 1 आणि 2 जानेवारी रोजीही किंमती स्थिर राहिल्या आहेत. सध्या एक किलो चांदीचा दर ₹90,500 आहे. IBJA च्या माहितीनुसार, आजच्या सत्रात चांदीचा दर ₹87,167 आहे.
जळगाव सुवर्णपेठ…
जळगाव सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. गुरुवारी प्रति तोळा सोन्याचा दर ६०० रुपयांनी वाढल्याने शुक्रवारी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७१,०५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम (विनाजीएसटी) वर पोहोचला आहे. याशिवाय चांदीचा दरही प्रति किलो ८९,००० रुपयांपर्यंत (विनाजीएसटी) पोहोचला आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. ३० डिसेंबरला सोन्याचा दर १६० रुपयांनी वाढला होता, तर ३१ डिसेंबर रोजी ३०० रुपयांनी घट झाला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर १०० रुपयांनी वाढला आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत त्यात एकूण ७०० रुपयांची वाढ झाली आहे. याच काळात चांदीच्या दरातही १००० ते १५०० रुपयांची वाढ झाल्याचे निरीक्षण आहे.
स्थानिक करांमुळे भावात तफावत
सोने-चांदीचे दर ठरवताना वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दरात करांचा समावेश नसतो. मात्र, स्थानिक सराफा बाजारात शुल्क आणि करांचा समावेश होत असल्याने दरांमध्ये तफावत दिसते.
खरेदीसाठी खिसा गरम ठेवा
या आठवड्यात सराफा बाजारात खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किंमतींचा विचार करून तयारीने खरेदी करा. मौल्यवान धातूंच्या वाढत्या दराचा परिणाम खिशावर जाणवणार आहे.