सव्वा कोटींचा मालमत्ता कर थकविला : धुळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रला लागले टाळे

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीच्या इमारतीत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून 2011 पासून बँकेकडे मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरण्यात न आल्याने बँकेच्या इमारतीला कुलूप ठोकण्यात आल्याने बँकेच्या ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, बँकेकडे तब्बल एक कोटी 14 लाख 36 हजार 292 होवूनही बँक प्रशासनाने थकबाकी भरण्याची तसदी न घेतल्याने बुधवार, 8 मार्च रोजी गल्ली क्रमांक चार येथील इमारतीला महानगरपालिकेने टाळे ठोकले.

बँकेकडून तडजोडीस नकार

मालमत्ता करात तडजोड करण्याबाबत जिल्हा न्याय विधी मंडळातर्फे बँकेला नोटीसही बजावली होती पण तडजोडीस बँकेने नकार दिला होता. त्यामुळे महानगरपालिकेने पुन्हा नोटीस बजावली होती मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महानगरपालिकेच्या वसुली पथकाने बँकेला बुधवारी टाळे ठोकले. वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर वडनेरे, मुकेश अग्रवाल, सुनील गढरी, संजय शिंदे, अनिल सुडके, राजू गवळी, प्रदीप पाटील, अनिल जोशी, मधुकर पवार, अशोक मंगीडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.