नंदुरबार : मध्यवस्तीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केला. यामुळे एकच खळबळ उडाली. शहादा शहरात ही घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. वनविभागाला तब्बल चार तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले.
शहादा शहरातील आदित्य हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक बिबट्या आत शिरला. बिबट्या आल्याने रुग्णालयात असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, रुग्णालयात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. वनविभाग आणि पोलीस दलांना तब्बल चार तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, बिबट्याचा शहरी भागातील वावर हा चिंतेचा विषय बनला आहे.