तळोदा : तालुक्यातील मोरवड गावाजवळ एक मादी बिबट मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, विजेचा धक्का बसल्याने या तीन वर्षीय मादी बिबटचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वनविभागातर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या घटनेने वन प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.
तळोदा (प्रा.) वनक्षेत्रातील राणीपूर परिमंडळातील धनपूर नियत क्षेत्रात मौजे मोरवड गावाजवळ धानोरा – मोरवड रस्त्यावर 29 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अजित रघुनाथ चौधरी यांचे शेतात एक बिबट मृत अवस्थेत आढळून आला. मृत बिबट प्राण्याचे शवविछेदन डॉ. अजय मोलके, पशु वैद्यकीय अधिकारी तळोदा यांनी केले. मृत बिबट मादी असून दात व मिशा, चारही पायाचे पंजे व नखे सुस्थितीत आहेत. तसेच कातडी पूर्ण सुस्थितीत आहे. विजेच्या धक्यामुळे पाय भाजलेला असल्याने काळा पडला होता. त्यामुळे बिबटयाचा वीज प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याचे शव विच्छेदनात समोर आले.
या प्रकरणी वन गुन्हा नोंदविण्यात आलेला असून शवविच्छेदन नंतर मृत बिबट प्राण्यावर तळोदा आगार येथे जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत बिबट प्राण्याची राख आग थंड झाल्या नंतर तळोदा शहरापासून 2 किमी अंतरावर असणाऱ्या तापी नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जित केली.
यावेळी मेवासी वनविभाग तळोदा चे उपवनसंरक्षक श्री. लक्ष्मण पाटील तळोदा प्रा. वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल राणीपूर भारती सयाईस, वनपाल राजविहीर वासुदेव माळी, वनपाल आगार शांतीलाल अहिरे आणि वनरक्षक संदीप भंडारी, गिरधन पावरा, आशुतोष पावरा, जान्या पाडवी, विरसिंग पावरा, वाहन चालक दीपक बाळदे हे उपस्थित होते. पुढील तपास वनपाल राणीपूर करत आहेत.