---Advertisement---
धडगाव : गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांना दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर निरोप घेऊन जातात, पण त्यांच्या जाण्याने अनेकांचे डोळे पाणावतात. नंदुरबार जिह्यातील धडगाव शहरातल्या एका चिमुकलीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप्पाला निरोप देताना तिचे डोळे भरून आले आणि तिने बाप्पाला पुन्हा घरी घेऊन जाण्याचा हट्ट धरला.
पाच वर्षांची शिवण्या निकवाडे तिच्या कुटुंबासह गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीकिनारी गेली होती. दहा दिवस घरात बाप्पाचं आगमन झाल्यापासून शिवण्या खूप आनंदी होती. सकाळी लवकर उठून ती बाप्पाची आरती करायची, बाप्पासाठी लाडू आणि मोदक खायची आणि दिवसभर त्यांच्यासोबत खेळायची. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आला तेव्हा शिवण्या उत्साहात होती, बाप्पाला नाचत, गाणं म्हणत घेऊन निघाली होती. पण जसे ते विसर्जन स्थळी पोहोचले, बाप्पाला पाण्यात सोडण्याची वेळ आली, तसे शिवण्याच्या चेहऱ्यावरचा हसू मावळला आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.
शिवण्याने आपल्या बाबांचा हात घट्ट पकडून घेतला आणि हट्टाने म्हणाली, ‘बाबा, बाप्पाला घरी घेऊन चला, त्यांना पाण्यात सोडू नका.’ तिच्या निरागस डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन हेलावलं. तिच्या बाबांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, ‘बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या घरी येतील.’ पण शिवण्याला काहीच ऐकू येत नव्हतं. तिचे अश्रू थांबतच नव्हते. अखेर, मोठ्या प्रयत्नांनी बाप्पाचं विसर्जन झालं, पण शिवण्या अजूनही बाप्पाच्या परत येण्याच्या विचारातच होती.
हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. गणपती बाप्पा आणि लहान मुलांमधलं हे निरागस नातं खूपच खास आहे. बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भक्ताला दुःख होतं, पण शिवण्यासारख्या चिमुकल्यांचं दुःख पाहून गणपती बाप्पाही नक्कीच गहिवरले असतील.