जळगाव : येथील महसूल विभागाने चक्क जिवंत व्यक्तीला मृत म्हणून दाखविले आहे. या प्रकारामुळे संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येथील पुनगाव रोड भागात ॲड. दीपक पाटील यांचा स्वमालकीचा प्लॉट आहे
त्यांनी त्याचा ऑनलाइन सातबारा उतारा काढला असता, त्यावर २८ ऑगस्ट २०२० ला दीपक पाटील मृत झाल्याची नोंद केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना धक्का बसून मनस्ताप झाला. प्राप्त माहितीनुसार ॲड. पाटील यांचा प्लॉट असलेल्या भागातीलच एका प्लॉटधारक महिलेने वारस दाखल्यासाठी महसूल विभागाकडे अर्ज केल्याने महसूल विभागाने वारस लावण्याची प्रक्रिया केली.
मात्र, ही नोंद त्या प्लॉटधारक महिलेच्या प्लॉटसह दीपक पाटील यांच्या प्लॉटसंदर्भातही करण्यात आली. ज्यात दीपक पाटील मृत झाल्याचे नोंदविण्यात आले. यावर मंडलाधिकारी वरद वाडेकर यांचे नाव असून एवढी महत्त्वाची नोंद असताना त्यात एवढा बेफिकीरपणा झाला कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, सारख्या नावाच्या दोन व्यक्ती असल्याने ही तांत्रिक चूक झाली असावी. हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रश्नच नाही. यात योग्य त्या प्रक्रियेअंती दुरुस्ती केली जाईल, असे मंडलाधिकारी वरद वाडेकर यांनी सांगितले