पोलिसांच्या सतर्कतेमुळे जळगावात मोठा गुन्हा टळला, कोर्टात करणार होते ‘खून का बदला खून’

जळगाव : शहर पोलिसांच्या सतर्कतेने आज सोमवारी दुपारी २ वाजता मोठी घटना टळली आहे. भुसावळात २०२० मध्ये झालेल्या खून प्रकरणात गेल्यावर्षी ‘खून का बदला खून’ राबवित नशिराबाद येथे धम्मप्रिय सुरडकर याची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आज दोघे पिस्तुल घेऊन बुरखा घालून जिल्हा न्यायालयात आले होते. जळगाव शहर पोलिसांना वेळीच गुप्त बातमी मिळाल्याने मोठी घटना टळली. पोलिसांनी एकाला पिस्तुलसह अटक केली असून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून ११ ऑक्टोबर २०२० रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाच्या डोक्यात रॉड घालून त्याचा खून करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयीत धम्मप्रिय मनोहर सुरडकर (वय-१८, रा.पंचशील नगर) याला पोलिसांनी अटक करीत कारागृहात रवानगी केली होती.

दि.२१ सप्टेंबर २०२१ रोजी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटून दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी तो वडील मनोहर आत्माराम सुरडकर (वय-४५) यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच.१९.एव्ही.९६५६ ने घरी जात होता. नशिराबाद येथे सूनसगाव रस्त्यावर एका टपरीवर थांबले असताना तीन तरुणांनी दोघांवर हल्ला केला होता. धम्मप्रिय याच्यावर केलेल्या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर मनोहर सुरडकर जखमी झाले होते.

 

खुनाच्या गुन्ह्यात नशिराबाद पोलिसांनी चौघांना अटक केली होती त्यापैकी दोघे सध्या जामिनावर असून शेख शमीर उर्फ समीर उर्फ भांजा शेख जाकीर वय-२१ आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन वय-२१ या दोघांची सुनावणी सुरू आहे. सोमवारी दुपारी २ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांवर न्यायालयातच गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा डाव धम्मप्रिय याचे वडील मनोहर यांनी रचला होता. सोमवारी ते तयारीनिशी न्यायालयात पोहचले मात्र गुन्हा घडण्यापूर्वीच शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील चौकशी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.