---Advertisement---
धुळे : मोरदड येथील जगदीश झुलाल ठाकरे (४२) यांची गावातील राजकीय संघर्षातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड घाटात मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
---Advertisement---
जगदीश ठाकरे हे २९ जूनपासून गावातून बेपत्ता होते. पत्नी अरुणा ठाकरे यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. रविवारी गावातील संशयित आरोपी अशोक मगन मराठे (वय ३२, रा. मोरदड), शुभम संभाजी सावंत (वय ३५, रा. मोरदड, सध्या पुणे) आणि वीरेंद्र सिंग उर्फ विक्की गोविंदसिंग तोमर (३३, रा. टाकळी प्र.चा., चाळीसगाव) अशा तिघांनी मिळून जगदीश यांना एका गाडीत बसवले. कन्नड घाटात नेऊन त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली.
धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयित अशोक मराठे आणि शुभम सावंत या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मोरदड गावात या हत्या प्रकरणामुळे संतप्त जमावाने आरोपींच्या घरावर दगडफेक केली.
तपास आणि पुढील कार्यवाही
जगदीश यांच्या डोक्यात दोन गोळ्या आढळून आल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत येथील जिल्हा रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन सुरू होते. या वेळी धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील, पोलिस फौजफाट्यासह उपस्थित होते.