दररोज मुलगा सोबत असायचा, ‘त्या’ दिवशी व्यापारी एकटेच होते, जळगावात ‘त्या’ घटनेनं खळबळ!

जळगाव : शहरातील व्यापारी ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी) यांची आठ लाख रूपये असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. पांडे चौक ते राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

सिंधी कॉलनी येथील व्यापारी ईश्वर मेघाणी यांचे दाणा बाजारात सुकामेवा विक्रीचे दुकान आहे. यांचे दानाबाजार येथे दुकान आहे. जिरे विक्रीतून मिळालेली रक्कम आठ लाख रुपये त्यांनी बँकेत भरणा करण्यासाठी बॅगेत ठेवले होती. पण, बँकेत भरणा न करता आल्यामुळे रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास ते पैशांची बॅग घेवून दुचाकीने घराकडे निघाले होते. दररोज त्यांच्यासोबत मुलगा असतो आज मात्र ते एकटेच होते. पांडे चौकाजवळील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ आले असता अचानक रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या एकाने त्यांना अडविले.

मेघाणी यांना काही कळायच्या आतच चोरट्याने पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवर असलेल्या दुस-या चोरटयासोबत पोबारा केला. नेमके तेव्हा आणखी एक चोरटा दुसऱ्या दुचाकीवर त्याच ठिकाणी होता. मेघाणी यांनी आरडा ओरड करताच एका तरुणाने त्यांचा पाठलाग केला. पण चोरटे पसार झाले होते.

रात्री १० वाजता अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, जिल्हापेठ, एमआयडीसी आणि एलसीबीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.