राष्ट्रवादीचे एक खासदार भाजपाच्या वाटेवर, चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अमोल कोल्हेंच्या एका भाषणाच्या क्लिप्स व्हायरल करून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी चुकीचा अर्थ काढू नये, असं स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र, आता भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राज्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या मुलाखतीमध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याविषयी भाष्य केलं. सध्या शिंदे गटाकडे ३९ अधिक १० म्हणजेच ४९ संख्याबळ आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना तेवढ्यावरच थांबवायचं असा कोणताही विषय कुणाच्याही डोक्यात नाही. बावनकुळेंनाही तसं म्हणायचं नव्हतं. पण त्यावर आत्ताच निर्णय घेता येणं शक्य नाही. सर्वे होतील, बैठका होतील, मतमतांतरं होतील, नवीन माणसं येतील, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, अमोल कोल्हे भाजपात आले, तर पुढे काय होणार? याविषयी चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहेत. अढळरावांसारखा तीन टर्मचा खासदार असतानाही उद्या कोल्हे भाजपात येणार असले, तर आढळरावांना समजावलंच जाईल की कोल्हे विद्यमान खासदार आहेत. पण मग कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायची की भाजपाकडून लढायची? असं चंद्रकांत पाटील म्हणाले.