नंदुरबार : धडगाव तालुक्यातील भूजगाव ग्रामपंचायतीत वेगवेगळे अभिनव प्रयोग राबविले जात असून आता नव्या प्रयोगामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
येथील महिला ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम लागू करण्याचा ठराव करण्यात आला असून हरणखुरी आणि भुजगाव गाव बालविवाह बंदी क्षेत्र घोषित करण्यात आले. याबाबत कुणी ठराव मोडण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
सरपंच अर्जुन पावरा म्हणाले की, ग्रामसभा ही गाव विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्वाची असते, परंतु नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवतांना दिसतात, हे गाव विकासासाठी धोक्याचे आहे. गावातील जनतेचा ग्रामसभेत आणि निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग वाढवा यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न केले जात आहे, कालच्या ग्रामसभेत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्यात गावात बालविवाहास पूर्णपणे बंदी एक मताने झालेला ठराव महत्वाचा ठराव ठरला. त्यामुळे गावाचे सामाजिक आरोग्य चांगले राहील.