मुंबई : चांगल्या जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. निफ्टीने प्रथमच 20269 च्या पातळीला स्पर्श केला. BSE सेन्सेक्स 493 अंकांच्या वाढीसह 67481 च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 134 अंकांपेक्षा जास्त वाढीसह 20,268 च्या पातळीवर बंद झाला. गुरुवारी NSE निफ्टी 20133 च्या स्तरावर बंद झाला होता, जो शुक्रवारी 20194 च्या स्तरावर उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारात 20281 च्या पातळीवर जावून 20,267.90 वर बंद झाला.
बीएसई सेन्सेक्सच्या टॉप गेनर्समध्ये टीव्ही18 ब्रॉडकास्ट, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एमटीएनएल, डिक्सन टेक्नॉलॉजीचे शेअर्स होते. शुक्रवारी निफ्टी मिडकॅप 100 ने शेअर बाजारात एक टक्का वाढ नोंदवली तर बीएसई स्मॉल कॅप अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. निफ्टी आयटी, निफ्टी बँकसह अनेक निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी ऑटो कमजोर राहिला तर निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस सारख्या निर्देशांकातही वाढ झाली.
शेअर बाजारातील प्रचंड वाढीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. आजच्या व्यापारातील मार्केट कॅप 337.53 लाख कोटी रुपये होते जे गेल्या सत्रात 335.58 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये आयटीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.28 टक्के वाढ झाली. तर एनटीपीसी, अॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले.
शुक्रवारच्या तेजीत मल्टीबॅगर परतावा देणार्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, एक्साइड इंडस्ट्रीज, पटेल इंजिनीअरिंग, स्टोव्ह क्राफ्ट, युनि पार्ट्स इंडिया आणि देवयानी इंटरनॅशनलच्या शेअर्सनी वाढ नोंदवली तर गती लिमिटेड, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा. कामधेनू लिमिटेड, जिओ फायनान्शियल आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्स घसरले.