10+2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत ; पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज, 29 जुलै रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP-National Education Policy) तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचं (Akhil Bhartiya Shiksha Samagam) उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिक्षेचं महत्त्व पटवून देताना भविष्यातील शैक्षणिक बदलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावी ऐवजी नवीन शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार असून CBSE अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपारिक ज्ञान प्रणालीपासून भविष्यातील तंत्रज्ञानाला संतुलित पद्धतीने महत्त्व देण्यात आले आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘देशातील शिक्षणतज्ज्ञांनी संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना नवीन व्यवस्थेची चांगली माहिती आहे. 10+2 शिक्षण पद्धतीच्या जागी 5+3+3+4 शिक्षण पद्धत सुरू केली जात आहे. भारताला संशोधन आणि नवीन कल्पनांचे केंद्र बनवण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या काळात देशातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम लागू केला जाईल. यासाठी 22 भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत. दरम्यान यावेळी पीएमएसश्री योजनेचा पहिला हप्ताही जारी करण्यात आला. पंतप्रधान म्हणाले की, ”शिक्षणातच देशाचे नशीब बदलण्याची ताकद आहे. देश ज्या ध्येयाने पुढे जात आहे, त्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावरही पंतप्रधान मोदींनी भर दिला.