राज्यसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजप देणार चौथा उमेदवार ?

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीत तीनच उमेदवार उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सहा जागांवरील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाची गणिते बलदलली आहेत. चव्हाणांच्या पक्षांतरानंतर भाजप तीनऐवजी चार जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मतांच्या कोट्यानुसार भाजपला तीन जागा सहज जिंकता येणार आहेत. तर चौथ्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याशिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक-एक जागा जिंकता येणार आहे. भाजपला तीन, अजितदादांना एक आणि एकनाथ शिंदेंना एक, अशा एकूण पाच जागा जिंकल्यानंतर उरलेल्या मतांतून सहाव्या जागेची बेगमी करावी लागणार आहे. याशिवाय अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या रुपाने भाजपला मोठी लॉटरी लागली आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी चार जागा रिक्त आहेत. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला, तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. तर भाजप आमदार गोवर्धन शर्मा आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. त्यामुळे आमदारांची संख्या चारने घटून २८४ इतकी झाली आहे. राज्यसभेवरील एका जागेसाठी मतांचा कोटा ४० इतका होत आहे.

काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ ४५ होतं. परंतु अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांच्यानंतर ते ४३ वर गेलं आहे. आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील ३ आमदार चव्हाणांच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यभरातील १२ ते १४ आमदार अशोक चव्हाण समर्थक असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे काँग्रेसची समीकरणं बिघडण्याची शक्यता आहे.