कोरोनाचा नवा व्हेरियंट; महाराष्ट्र अॅलर्ट मोडवर; आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : कोरोनाच्या जेएन१ व्हेरियंटनं आता डोकं वर काढलं असून देशभरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही सध्या ५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य प्रशासन अॅलर्ट मोडवर आलं असून आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उपाययोजनांबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.

कोरोनाचा ११ राज्यांमध्ये शिरकाव झाला आहे. त्यामुळं नागरिकांची चिंता वाढली आहे. राज्यातही जेएन. १ हा नवा व्हेरियंट आढळल्यानं चिंता वाढली आहे. राज्यात सध्या या व्हेरियंटचे ५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार अॅलर्ट मोडवर असून आरोग्य मंत्र्यांनी तातडीची बैठकही बोलावली आहे. दरम्यान, नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर योग्य वर्तन गरजेचे असल्याची सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन.१’ या नव्या उपप्रकाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळला आहे. केरळमध्ये सर्वप्रथम ७९ वर्षीय महिलेला याची लागण झाली. ही महिला आता पूर्णपणे बरी आहे. त्यानंतर ‘जेएन. १’चा देशातील दुसरा रुग्ण महाराष्ट्रात आढळला असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ वर्षीय पुरुषाला या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झाला आहे.

‘जेएन.१’ हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नवीन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोरोना रुग्णांसाठी चार हजार ७०० खाटांची व्यवस्था केली आहे. त्यात विलगीकरणापासून ते व्हेंटिलेटरपर्यंतच्या खाटांचा समावेश आहे.

हे करा
सहव्याधी असलेल्या रुग्णांनी गर्दीत जाणे टाळा
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा
वारंवार स्वच्छ पाण्याने हात धुवा