अयोध्या : दिवाळी पर्वानिमित्ताने उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या भव्य दीपोत्सवासाठी शरयू नदीवरील ५१ घाट सज्ज झाले आहेत. यंदाच्या वर्षी या दीपोत्सवात २४ लाख दिवे उजळवले जाणार आहेत. हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण शहराची सजावट करण्यात आली आहे. लेझर शोचीही तयारी सुरू आहे. लेझर शोच्या माध्यमातून प्रभू श्रीराम चरित्राची झलक दाखवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार दीपोत्सवाची सर्व तयारी करण्यात येत आहे. दीपोत्सवात २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले असून, पुन्हा एकदा विश्वविक्रम करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत बहुतांश दिवे स्वयंसेवकांनी सर्वच घाटांवर सज्ज केले. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या दीपोत्सवात भारत कुंड, गुप्तार घाट, बिर्ला धर्मशाळा, रामघाट, रामकथा पार्कमध्ये भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या काठावरील लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शरयू नदीच्या काठावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरयू नदीचा किनारा अतिशय सुंदररित्या सजवण्यात आला आहे. दीपोत्सवात परदेशी कलाकार रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यात रशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि नेपाळमधील कलाकार भाग घेणार आहेत. देशातील २१ राज्यांतील रामलीला आणि रामायण परंपरेवर आधारित लोक सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे अडीच हजार कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत.