दोघे जळगाव जिल्ह्याचे : प्रेमीयुगुलाने संभाजीनगरमध्ये मारली रेल्वेसमोर उडी, तरुणाचा मृत्यू

मुक्ताईनगर : तो आणि ती मुक्ताईनगरात सोबत शिकले अन् त्यांच्यात प्रेम बहरले मात्र घरच्यांनी लग्नाला विरोध करीत तिचा मध्यप्रदेशातील युवकाशी विवाह उरकला अन तोही देखील तिच्या आठवणीत पुण्यात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी निघून गेला मात्र लग्नानंतर पतीकडून होणार्‍या त्रासाची माहिती तिने प्रियकराला दिली व त्यानेदेखील काळजी करू नको, मी करेल लग्न म्हणत तिच्या सोबत प्रवास सुरू केला मात्र अचानक दोघांनी संभाजीनगरात मंगळवारी रात्री 10.30 वाजता धावत्या रेल्वेपुढे उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत उमेश मोहन तारू (23, चांगदेव, ता. मुक्ताईनगर) या युवकाचा मृत्यू झाला तर मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय नवविवाहित प्रेयसी गंभीर जखमी झाली.

अन धावत्या रेल्वेपुढे मारली उडी !
दोन वर्षांचे प्रेम असूनही कुटुंबाने विरोध करत मुलीचे लग्न लावून दिले मात्र, महिन्याभरात मुलीला त्रास सुरू झाला. तिने तिच्या प्रियकराला ही बाब कळवताच त्याने तिला आपण पुन्हा लग्न करू, तू काळजी करू नको, असे आश्वासन दिले. सोमवारी तिला ठाण्यातून घेत पुण्याला नेले. तेथून मित्रांना मंगळवारी छत्रपती संभाजीनगरला घ्यायला बोलावले मात्र मित्र अजिंठापर्यंत पोहोचलेले असतानाच फोनवरच आम्ही आत्महत्या करत असल्याचे सांगत दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली.

कुटुंबाने समजून न घेतल्याने उचलले टोकाचे पाऊल !
दोघांनी घर सोडल्याची माहिती तोपर्यंत नातेवाईकांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे दोघांना सलग कॉल सुरू झाल्याने तरुणीने मोबाईल बंद केला मात्र रमेशला कॉल सुरूच होते. आई, वडील, भावासह तरुणीचे नातेवाईक त्याला संपर्क करून रागावत होते. रमेशचा भाऊ मात्र त्यांना समजावून सांगत होता. रमेशला मात्र इतर नातेवाईकांचे रागावणे असह्य झाले. हे आपले लग्न लावणार नाहीत, असे म्हणत सोबतच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

मित्रांना घ्यायला बोलावले
नात्यातच असलेले उमेश व राणी (काल्पनिक नाव) या दोघांचे दोन वर्षांपासून एकमेकावर प्रेम होते. आठ महिन्यांपूर्वी रमेश शिक्षणासाठी पुण्याला भावाकडे गेला होता. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी कुटुंबाने मात्र राणीचे मध्य प्रदेशच्या मुलासोबत लग्न लावले. हा प्रकार उमेशला असह्य झाला होता. लग्नानंतर काही दिवस त्यांचा संपर्क तुटला परंतु 27 मार्च रोजी राणी पतीसह ठाण्याला स्थायीक झाली. तेव्हा तिने उमेशला संपर्क केला. माझा पती मला त्रास देत आहे, असे सांगितले. तेव्हाच उमेशने पुन्हा राणीला लग्नाचे वचन देत पळवून नेण्याचा निश्चय केला. ठाण्याला जात त्याने टॅक्सीने प्रेयसीसह पुणे गाठले. मंगळवारी दोघे साडेदहा वाजता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले. तेव्हाच रमेशने गावाकडील मित्रांना आम्हाला संभाजीनगरला घ्यायला या, असे कॉल करून सांगितले होते.

हातात हात घेत रेल्वेसमोर घेतली उडी !
रात्री साडेदहा वाजता दोघेही रेल्वेरुळाजवळ उभे होते. राणी कॉलवर बोलत असतानाच रमेशने तिच्या पकडलेल्या हातासह रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेच्या धडकेत दोघेही लांब फेकले गेले. रमेश मात्र गंभीर जखमी झाला. राणी जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडत होती. स्थानिकांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना घटनेची माहिती दिली. बागवडे यांनी तत्काळ पथक रवाना केले. रमेशच्या शरीराचे तुकडे झाले होते तर राणी मात्र शुद्धीत होती. तिला पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले.

मला रमेशला बघायचेय, राणीचा आक्रोश !
रात्री साडेदहा वाजता घटना घडल्यानंतर राणी जखमी झाली. मात्र, अंधारात रमेश मात्र तिला दिसत नव्हता. पोलिस पोहोचल्यानंतर ती सतत मला रमेशला पाहायचेय, असे म्हणत होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतरदेखील ती सतत मला रमेशला शेवटचे पाहू द्या, अशी विनंती करत होती. बुधवारी सायंकाळी पाच वाजता उमेशवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.