आता चंद्रावर उभारली जाणार अणुभट्टी; रोल्स रॉयसचा प्रकल्प

तरुण भारत लाईव्ह । २१ मार्च २०२३। गेल्या काही वर्षांमध्ये चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या अंतराळ संस्थांकडून वेगवेगळे प्रकल्प  राबवण्यात येत आहेत. आता चंद्राच्या पृष्ठभागावर 2029 पर्यंत न्यूक्लिअर रिऍक्टर उतरवण्याची तयारी सुरू असून ब्रिटनच्या रोल्स रॉयस  त्यासाठी प्रयत्न करत आहे. या न्युक्लिअर रिऍक्टरच्या माध्यमातून चंद्रावरील उर्जेची गरज भागवण्यात येईल. या कामासाठी रोल्स रॉयसला एका संस्थेकडून निधी मिळाला आहे.

रोल्स रॉयस ही फायटर जेट इंजिन आणि लक्झरी कार बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. रोल्स-रॉईस आणि यूके स्पेस एजन्सीच्या मायक्रो न्यूक्लिअर प्रोग्रॅमचे उद्दीष्ट हे चंद्रावरील मून बेससाठी उर्जा पुरवठा करणे हे आहे. रोल्स रॉयसच्या या प्रकल्पासाठी त्यांना 23.93 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

अमेरिकन अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या दिशेने काम करत आहे. 2025 मध्ये नासाला आर्टेमिस 3 मिशन लाँच करायचं आहे. त्याचा उद्देश चंद्रावर दीर्घकालीन मानवी वस्ती सुनिश्चित करण्यासाठी कार्य करणे हा आहे. रोल्स रॉयसची अणुभट्टी त्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

ब्रिटनच्या विज्ञान विभागाचे राज्यमंत्री जॉर्ज फ्रीमन यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 50 वर्षांनंतर पुन्हा चंद्रावर मानव पाठवण्याची तयारी आहे. अशा परिस्थितीत रोल्स रॉयसकडून न्यूक्लिअर रिऍक्टर तयार करण्यात येणार आहे. 2029 पर्यंत चंद्रासाठी न्यूक्लिअर रिऍक्टर तयार करण्याची रोल्स रॉइसची योजना आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रावर काम करणारी अणुभट्टी ही सामान्य अणुभट्ट्यांपेक्षा आकाराने लहान असेल. त्याचा वापर अंतराळवीरांना होईल. ही अणुभट्टी उच्च हवामानातही काम करू शकते. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास मानवाला चंद्रावर दीर्घकाळ राहता येईल.