अडावद, ता. चोपडा, २४ जानेवारी : येथील ग्रामपंचायत नजिक असलेल्या गल्लीत एका महिंद्रा मॅक्सिमो वाहनाने प्रियांशी संदिप पाटील या दीड वर्षाच्या बालिकेला चिरडले. ही दुर्दैवी घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुवर्णा संदिप पाटील या घरासमोरील दुकानात ताक घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना त्यांची दीड वर्षाची मुलगी प्रियांशी संदिप पाटील तिच्या मागे धावत आली. त्याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिंब चौकाकडे जाणाऱ्या महिंद्रा मॅक्सिमो (वाहन क्रमांक एम.एच. ३९ जे. ७४२४) ने जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियांशी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
वाहन चालकावर गुन्हा दाखल
या घटनेनंतर सुवर्णा संदिप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव, ता. चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजू थोरात, आणि सतिष भोई करीत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, बालिकेच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.