नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जात आहे. अशातच सुनावणीत मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाने ऐनवेळी हुकमी अस्त्र बाहेर काढत खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे शिंदे गट बॅकफूटवर गेला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला वेग दिला आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना देखील राहुल नार्वेकर ओव्हरटाईम करून आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेत असून दोन्ही गटातील आमदारांची उलट तपासणी करीत आहेत.
अपात्रता सुनावणीत नेमकं काय घडलं?
शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी केली. यावेळी लांडे आपलं म्हणणं मांडत असतानाच ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांसमोर एक एक अटेंडन्स शीट सादर केली.
२१ जून २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेच्या २३ आमदारांनी सह्या केल्या होत्या.
यामध्ये सध्या शिंदे गटात असलेले आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्या देखील सह्या आहेत. या अटेंडन्स शीटवरून ठाकरे गटाचे वकील जोरदार युक्तीवाद करत शिंदे गटातील आमदारांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.