पहूर : जामनेर मार्गावरील सोनाळा शीव रस्त्यावर अज्ञात तरुणाची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची बाब मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली होती. मयताची ओळख पटवण्याचे आव्हान समोर असताना मयताच्या खिशाला असलेल्या टेलरच्या लेबलवरून ओळख पटल्यानंतर मयत शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ (37) असल्याचे निष्पन्न झाले होते. मयताच्या खून प्रकरणी रात्री उशिरा दोन आरोपींना जळगाव गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खुनाचे कारण अस्पष्ट
पहूर-जामनेर मार्गावील हॉटेल वृंदावन नजीक सोनाळा-पहूर शीव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात बाळू वाघ या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. घटनास्थळी मद्याचे तीन ग्लास तसेच रक्ताने, अर्धवट खाल्लेला वडापाव व माखलेला दगड आढळल्याने खुनात दोन संशयित असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. कुठल्यातरी वैमनस्यातून तरुणाची हत्या करण्या आल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपींनी आधी पार्टी केल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्यास काही अंतरावर फरफटत नेल्याचे दिसून आले होते. दरम्यान, मयताच्या पॅन्टवर चॉईस टेलर्स अशी पट्टी आढळून आल्याने जामनेर येथील चॉईस टेलर्सचे संचालक विजय जैन यांना घटनास्थळी बोलावल्यानंतर त्यांनी मयताची ओळख पटवली होती.
पोलिस अधिकार्यांची धाव
तरुणाच्या खुनानंतर सहा.पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पहूरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, जामनेर पोलिस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल गायकवाड आदींनी धाव घेतली होती.
दोन संशयित ताब्यात
जळगाव गुन्हे शाखेसह पहूर पोलिसांनी खुनातील दोन संशयित निष्पन्न केले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परीवार आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.