APMC Election : यावलमध्ये महायुती पॅनलचा दणदणीत विजय

जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. यामध्ये यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या मतमोजणीत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मावळत्या पंचवार्षिकमध्य सत्तेत असणार्‍या महायुतीला महाविकास आघाडीने तगडे आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेना व रिपाइंला सोबत घेऊन सहकार पॅनलची निर्मिती केली होती. यात प्रामुख्याने तरूण आणि अनुभवी यांचा मिलाफ साधण्यात आला होता. ना. गिरीश महाजन व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे व अमोल हरीभाऊ जावळे यांनी पॅनलचे नेतृत्व केले होते. तर महाविकास आघाडीतर्फे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी धुरा सांभाळली होती.

दरम्यान, आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय संपादन करून एकहाती वर्चस्व संपादन केले.