जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी, ६ जानेवारी २०२५ रोजी, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सागर लॉजवर छापा टाकून चोरीछुपा चाललेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली, तर दोन तरुणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर लॉजच्या जी सेक्टरमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत काही महिलांना बळजबरीने वेश्या व्यवसायासाठी ठेवले असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या या कार्यवाहीने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकारे जळगाव पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करीत जनतेला सुरक्षिततेची खात्री दिली आहे.