नंदुरबार : शहरात एका व्यापाऱ्याच्या घरात पडलेल्या दरोड्यात ६ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. वृद्ध महिलेला चाकूचा तर वृद्धाला बंदुकीचा धाक दाखवला. वृद्धाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नंदुरबार उपनगर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तीन दरोडेखोर असून त्यांनी किचनच्या खिडकीची जाळी तोडून घरात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी दोन पथके स्थापन केली असून, परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण ही तपासण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील नेहरु पुतळ्याजवळ जयहिंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक नरेशकुमार लेखराज नानकाणी हे जुनी सिंधी कॉलनीत झुलेलाल नगरात राहतात. त्यांच्या घरात वडील लेखराज खिमल नानकाणी, आई मिरादेवी, पत्नी पिंकी, मुले गुंजन व कार्तिक सोबत राहतात.
बुधवारी पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना खिडकीची जाळी तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांनी मिरादेवी त्यांच्या घरातील स्वयंपाक घरातील यांच्या गळ्यावर चाकू ठेवून धाक दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने काढले. त्यावेळी आरडाओरड केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने जबरीने काढत असताना कपाट उघडण्याचा आवाज आल्याने लेखराज नानकानी यांना जाग आली.
त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर मारुन दुखापती केले. ओरडले तर गोळी मारण्याची धमकी दिली. यावेळी घरातील इतर बेडरुमला बाहेरून दोरीने बांधण्यात आले होते. त्यामुळे मदतीला कुणी येऊ शकले नाही. लेखराज नानकानी यांच्या सांगण्याप्रमाणे तिघा दरोडेखोरांपैकी एकाने त्याचे तोंड काळ्या रंगाच्या कपड्याने बांधलेले व गडद मरुम रंगाचा हाफ बाहीचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली होती.
इतर दोघांनी काळ्या रंगाचे हाफ बाहीचे शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली होती. तिघे अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटाचे तसेच मध्यम सडपातळ शरीरायष्टीचे होते. याबाबत नरेशकुमार नानकानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भर वस्तीत झालेल्या या घटनेमुळे परिरसरासह शहरातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरातील आणखी एका पेट्रोल पंपावर देखील अशा प्रकारचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती. परंतु पोलिसांनी त्याचा इन्कार केला आहे.