तरुण भारत लाईव्ह । अमोल पुसदकर।
नुकताच आम्ही गणतंत्र दिवस साजरा केलेला आहे. आम्हाला आमचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी प्राप्त झाले. या संविधानामुळे आम्हाला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून काही हक्क, अधिकार प्राप्त झाले व काही कर्तव्य सुद्धा सांगण्यात आले. परंतु आज देशाची परिस्थिती पाहिली तर आपल्या असे लक्षात येईल की, सर्वांना आपल्या अधिकारांचे स्मरण असते. आपल्या हक्कांसाठी ते उठाव करतात, लढा देतात, आंदोलन करतात. श्रमिकांच्या संघटना आहेत. कारखानदारांच्याही आहेत. कर्मचार्यांच्याही आहेत. काम करणारा प्रत्येक वर्ग कुठे ना कुठे संघटित होतो व आपल्या हक्कांवर बोलतो, हक्कांसाठी आंदोलन करण्याची तयारी त्याची असते. परंतु कर्तव्यांचे काय? संविधानाने आपल्याला आपली कर्तव्ये सुद्धा सांगितलेली आहेत. परंतु आम्ही कर्तव्यांकडे अगदी सरळसोट Neglect duty डोळेझाक करीत असतो. स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून मी माझ्या मिळकतीवरचा कर भरला पाहिजे हे माझे दायित्व आहे. परंतु आज आपल्या असे लक्षात येते की, सर्वच लोक कर कसा चुकवता येईल याचाच प्रयत्न करीत असतात. त्याच्याच पळवाटा माहीत करण्यासाठी मात्र ते पैसे खर्च करीत असतात.
वाहतूक व्यवस्थित चालली पाहिजे यासाठी ठिकठिकाणी सिग्नल लावलेले असतात. परंतु जर पोलिस तिथे हजर नसेल तर त्या सिग्नलचे पालन करणारे Neglect duty फार थोडेच आपल्याला दिसतात. सर्वांनाच स्वच्छ आणि सुंदर शहर आवडत असते. परंतु ती स्वच्छता इतरांनी करावी अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे कारमधून जात असताना, बसमधून जात असताना हातातील पुडका ते बाहेर फेकण्यास सदैव सज्ज असतात. सार्वजनिक ठिकाणी एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर त्याचा कागद रस्त्यावरच फेकला जातो. भाजी बाजारातला कचरा हा रस्त्यावरच फेकला जातो. प्रत्येकाला त्याच्या घरचा कचरा समोरच्याच्या दाराशी टाकण्यामध्ये विशेष उत्सुकता असते. सार्वजनिक मालमत्ता ही थुंकण्यासाठी व कचरा फेकण्यासाठीच असते अशा पद्धतीचा समज सर्वत्र दिसून येतो. शहरातून वाहणारी नदी, शहरात असणारे तलाव हे सुद्धा कचरा फेकण्यासाठी व घाण करण्यासाठी असतात अशा पद्धतीचा समज काही लोकांचा दिसून येतो. ‘येथे थुंकू नये’ अशा पाट्याच पिचकार्यांनी रंगलेल्या असतात. सर्वांना स्वच्छता पाहिजे आहे. परंतु ती करणार कोण? अमलात कशी आणायची याच्यावर विचार करायला, वेळ द्यायला कोणालाही वेळ नाही असे दिसून येते. आपल्या घरातील लाईट थोडा वेळ सुरू राहिला तर एकमेकांच्या नावाने घरात आरडाओरड होत असते. बिल जास्त येईल याची आठवण करून दिली जाते. परंतु रस्त्यावरील पथदिवे जर चुकून सुरू राहिले Neglect duty तर त्याची सूचना विद्युत विभागाला कोणीही करीत नाही. घरातील नळ ताबडतोब बंद व्हायलाच पाहिजे. परंतु सार्वजनिक नळ सुरू राहिला तर माझे काय बिघडते अशा पद्धतीची विचारसरणी लोकांची आपल्याला दिसून येते.
ज्या ठिकाणी सिग्नल नाही अशा चौकांमध्ये रस्त्यावरून जाण्याचा अधिकार पहिले माझाच आहे अशा पद्धतीची भावना दिसून येते. त्यामुळे दर थोड्या थोड्या वेळाने अशा चौकांमध्ये वाहतूक थांबत असते व मोठ्या रांगा लागत असतात. सर्व लोक सुज्ञ आहेत. वाहतुकीचे नियम सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा Neglect duty वाहतूक पोलिसांनी अडविल्यावर त्याला आपली ओळखी कोणाशी आहे हे सांगून सुटण्याकडे कल अधिक असतो. शिक्षण हे एक उदात्त कार्य होते. परंतु स्वातंत्र्यानंतर त्याचे बाजारीकरण झाले. शिक्षकाला गुरूचा दर्जा होता परंतु हल्ली तो राहिलेला नाही. तसेच वैद्यकीय व्यवसायाचे सुद्धा झाले. डॉक्टरांना लोक देव मानायचे परंतु तिथे मोठ्या प्रमाणावर बाजारीकरण झालेले दिसून येते. पेशंटकडे बळीचा बकरा म्हणून पाहण्याची मानसिकता दिसून येते. सरकारी बाबू तर काही खाल्ल्याशिवाय काम करायलाच तयार नसतात. विविध ठिकाणी सेवेच्या नावावर चालणार्या विभागांमध्ये सेवा करण्याकडे कल कोणाचा राहिलेला नाही असे दिसून येत असते. वकील सुद्धा केस लढवताना समोरच्या पक्षाशी काहीतरी आर्थिक लाभ घेऊन बांधील झालेला असतो व तो आपल्याच अशिलाच्या विरोधात वेळकाढूपणाचे धोरण राबविताना दिसतो. पोलिस, गुंड, वकील यांचे संगनमत तर आपल्याला माहीतच आहे.
रस्त्यारस्त्यावर सामान्य नागरिकांना थांबवून त्यांच्याकडून पैसे उकळणारे पोलिस आपल्याला नेहमीच दिसतात. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवाल्याकडून पैसे घेताना Neglect duty सुद्धा आपण अनेक वेळा पोलिसांना पाहत असतो. एखाद्या निर्दोष माणसावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना सुद्धा घडत असतात, तर आरोपीला मोकळे सोडण्यासाठी किंवा कमी त्रास होण्यासाठी गुन्ह्याचे कलम सुमार दर्जाचे लावण्यासाठी पैसे खाताना आपल्याला अनेक पोलिस अधिकारी दिसत असतात. अनेक कार्यालयांमध्ये महिलांना काम करण्यासाठी भयमुक्त वातावरण मिळत नाही. तिथेही त्यांना त्रास देण्याचे, त्यांच्या शोषणाचे प्रकार घडताना आपल्याला दिसत असतात. जी बाई लहान मुलांना घरामध्ये आईसारखे सांभाळायची तिला आया म्हटले जायचे. अशा आयांकडूनही मुलांना मारण्याचे, उपाशी ठेवण्याचे व काही ठिकाणी त्यांच्याकडून भीक मागून घेण्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत. सगळीकडे डोळेझाक सुरू आहे. बांधल्या जाणार्या रस्त्याची गुणवत्ता खराब असेल तर त्याकडे सरकारचे, अधिकार्यांचे व जनतेचे सुद्धा लक्ष नसते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याकडे शिक्षक व पालक दोघांचीही डोळेझाक असते. विद्यार्थ्यांना सुद्धा कष्ट करून विद्या मिळवायची नसते. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी ‘देव करो आणि आमची परीक्षा कोरोनामध्ये बुडो’ अशा पद्धतीची प्रार्थना करीत होते. कारखान्यामध्ये काम करणार्या मजुरांना सुद्धा कोरोनाच्या निमित्ताने जेवढ्या अधिक सुट्या मिळेल तेवढे चांगले, फक्त पगार मात्र पूर्ण मिळाला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा होती. प्रत्येकाला आपल्या घरापाशी सुंदर बगीचा असावा असे वाटते परंतु झाडे लावायला कोणीही तयार नाही.
आपण सर्वांनी आता आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण प्रजासत्ताक राष्ट्र आहोत. विकसित आणि शक्तिशाली होत आहोत. जगाने आमच्याकडे आदर्श राष्ट्र म्हणून बघावे यासाठी आम्हाला आमचा आळस झटकावा लागेल. नागरिक म्हणून चांगल्या सवयी आत्मसात कराव्या लागतील. कर वेळेवर भरावा लागेल. स्वच्छता हा स्वभाव बनवावा लागेल. सुरळीत वाहतुकीसाठी सहकार्य करावे लागेल. वृद्ध आणि अनाथ यांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. कुटुंबांनी, शाळांनी आपली मूल्य शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तरच आम्ही खरे खुरे प्रजासत्ताक राष्ट्र आहोत असे आम्ही म्हणू शकू.