जळगाव : राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या शिबिरासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या अॅपेरिक्षाचा मालवाहू रिक्षाची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. आदिती सोपान खडसे (वय १३) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना फैजपूर ते आमोदा रस्त्यावर ४ मे रोजी दुपारी घडली.
पोलीस सूत्रानुसार, सावदा येथील सातवीत शिक्षण घेणारे विद्यार्थी सार्थ शंतनू सरोदे (गणेश आयुर्वेदिक क्लिनिकचे संचालक डॉ. शंतनू सरोदे यांचा मुलगा), ओझल संदीप पाटील ( शिक्षक संदीप पाटील यांची मुलगी), आदिती सोपान खडसे (दंतरोग तज्ञ डॉ. सोपान खडसे यांची मुलगी) तिघेही प्रवासी अॅपेरिक्षा (क्र.एमएच.१९-सीव्ही. ३५९०) ने भुसावळकडे निघाले होते.
पिंपरुड फाटा ते आमोदादरम्यान समोरून लाकडे घेऊन येणाऱ्या मालवाहू रिक्षाने (क्र.एमएच.१९-७०६४) त्यांच्या अॅपेरिक्षा धडक दिली. या अपघातात आदिती खडसे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर ओझल संदीप पाटील, साथ सरोदे, प्रवासी रिक्षाचालक प्रभाकर ओतारी (२९, सावदा) हे जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपाचार सुरु आहेत.
परीक्षेच्या शिबिरासाठी निघाले होते विद्यार्थी
अपघातात मृत व जखमी विद्याथ्यर्थ्यांनी गेल्या वर्षीपासून भुसावळ येथील ‘पेस आयआयटी इन्सिट्यूशन’ या खासगी शिक्षण संस्थेत IIT, JEE आणि NEET च्या तयारीसाठी शिकवणी लावली आहे. ते संस्थेच्या फैजपूर येथील शाखेत शिकवणीला जातात. यंदाचे त्यांचे दुसरे वर्ष आहे. १ मे ते १५ मे या काळात भुसावळ येथील शाखेत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा शिबिरासाठी तेतीन दिवसांपासून भुसावळात येत होते. दरम्यान, काल त्यांचा भुसावळला जाण्याचा चौथा दिवस होता. मात्र, त्यापूर्वीच अपघात झाला.