त्या मेणबत्ती कारखाना आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत

तरुण भारत लाईव्ह । धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

मेणबत्तीच्या छोट्या कारखान्यात शॉर्टसर्किटने कच्च्या मालावर ठिणगी पडून लागलेल्या आगीत चार महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य दोघी गंभीर भाजल्या गेल्या. मृतांमध्ये भागवत मायलेकींचा समावेश आहे. आग लागल्यानंतर महिला कामगारांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. ही घटना धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील निजामपूरपासून जवळ असलेल्या वासखेडी शिवारातील चिखलीपाडा गावात मंगळवारी दुपारी दोनला घडली.

कारखान्यात चमकणारी मेणबत्ती अर्थात स्पार्कल कँडल बनवल्या जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आशाबाई भय्या भागवत (वय ३४), पूनम भय्या भागवत (वय १६), नैना संजय माळी (वय ४८), सिंधुबाई धुडकू राजपूत (वय ५८, सर्व रा. जैताणे) अशी मृत महिलांची नावे आहे तर संगीता प्रमोद चव्हाण ( वय ५५) या ७० टक्के तर निकिता सुरेश महाजन ( वय १८) ३० टक्के भाजल्या. जखमी महिलांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

पालकमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.

त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे दूरध्वनीवरून सांत्वन करून घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.