जळगाव : महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकी भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, सोबत असलेला एक सहकारी गंभीर जखमी झाला. एरंडोल तालुक्यात ही घटना घडलीय. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जालना जिल्ह्यातील योगेश निवृत्ती वानखेडे व असलेला त्यांचा मित्र भगवान पांडुरंग सोनवणे हे दोघंही पारोळ्याकडून जळगावला येत होते. दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास एरंडोल येथे रस्त्यावर चुकीच्या दिशेने ट्रक उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकीने ट्रकच्या मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकीचालक योगेश वानखेडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे सहकारी भगवान सोनवणे हे जखमी झाले.
अपघाताचा आवाज येताच आजूबाजूचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना तपासले असता योगेश वानखेडे मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघातात गंभीर झालेल्या तरुणाकडून माहिती घेऊन मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली.