जळगाव : महापालिकेच्या प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. याच्या चबुतऱ्याच्या प्रत्यक्ष कामास १५ ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आला. हे काम जवळपास १५ दिवसात पूर्ण होईल. यासाठी आमदार सुरेश दामू भोळे हे लोहपुरुषाचा पुतळा देणार आहेत.
शहरातील महत्वाच्या असणाऱ्या महापालिकेच्या १७ मजली इमारतीचे नामकरण ‘लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल’ असे करण्यात आले आहे. या इमारतीच्या प्रांगणात आता गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृती असणारा पुतळा उभारण्यात येत आहे. महापौर जयश्री महाजन यांच्या पाठपुराव्यानंतर लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याची उंची ७ फूट ८ इंच तर वजन ६५ ते ७५ किलोपर्यंत असणार आहे. या पुतळ्याचा रंग मेटल इफेक्ट पीयू मॅट लॅकर असणार आहे. पुतळा बनविण्यासाठी आयएसओ फायबर मटेरियल, आयएसओ जलकोट २ लेअर, ४५० मॅट धातूचे २ लेअर, आयएसओ रेझिन वापरण्यात आले आहे.
मनपा फंडातून अंदाजित १० लाख रुपये खर्च येणार आहे. आमदार सुरेश भोळे यांनी स्वखर्चातून ४ लाख रुपयांचा पुतळा दिला आहे. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या चबुतऱ्याचे बांधकाम प्रकल्प कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले यांच्या देखरेखखाली आर्किटेक्ट विशाल देशमुख, मक्तेदार अक्षय राणे हे करीत आहेत.