जळगावातील अट्टल चोरटा लोहमार्ग पोलीसांच्या जाळ्यात

भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी पंजाब मेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात जळगावातील आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून तीन लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे शिवाय अनेक चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जयेश अशोक राजपूत (19, मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपी पंजाब मेलवरच चोरीसाठी मंगळवारी रात्री येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्यास अटक करण्यात आली.

पंजाब मेलमधील चोरी प्रकरणी कारवाई
गजाला रेहान खान (50, जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) या 17 रोजी 12137 डाऊन पंजाबमेलच्या कोच क्रमांक ए- 1 च्या बर्थ क्रमांक 45 वरून मुंबई-भोपाळ प्रवास करीत असताना जळगाव-भुसावळ दरम्यान त्यांची एक लाख 54 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी जयेश राजपूत यास मंगळवारी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली.

अनेक गुन्हे उघडकीस येणार
आरोपीकडून या गुन्ह्यातील सात हजार 850 रुपयांच्या रोकडसह दोन लाख 22 हजार 983 रुपयांचा ऐवज तसेच दिड लाख रुपये किंमतीचे दहा मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, सहा.निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित तडवी, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, रेल्वे सुरक्षा बलाचे भूषण पाटील, महेंद्र कुशवाह, विनोद रावल, इम्रान खान, दीपक शिरसाठ आदींच्या पथकाने केली.