धुळे । गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या बॅग व पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. उषाबाई नारायण राक्षे (५२, नुरानगर, देवपूर, धुळे) असे अटकेतील महिलेचे नाव असून तिच्या ताब्यातून ३७ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ जप्त करण्यात आला आहे.
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना नगावबारी चौफुलीवर एक महिला संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले असता तिने बसमधून चोरी केल्याची कबुली दिली आणि अर्धवट तुटलेला गोफ पोलिसांच्या स्वाधीन केला.
अटक करण्यात आलेली उषाबाई राक्षे ही सराईत चोरटी असून तिच्याविरोधात यापूर्वी पारोळा व अमळनेर (जि. जळगाव) तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
रजेसिंग बंडूसिंग राजपूत (रा. अहिल्यानगर, शिरपूर, जि. धुळे) हे पत्नीसह शिरपूर येथे जाण्यासाठी दोंडाईचा बसस्थानकातून सुरत-शिरपूर बसमध्ये गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी बसले होते. बसमधील गर्दीचा फायदा घेत त्यांच्या बॅगेतून दोन तोळे वजनाचा, ७४ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, संजय पाटील, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, भारती पटले, प्रियंका बाविस्कर, हर्षल चौधरी, विनायक खैरनार, नीलेश पोतदार, सुशील शेंडे यांच्या पथकाने केली.
महिला चोरट्यांवर पोलिसांचा वॉच
बसस्थानक, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांनी विशेष गस्त व सापळा मोहिमेवर भर दिला आहे. यामुळे अशा सराईत चोरट्यांना अटक करण्यास यश मिळत आहे.