पुणे, देहूरोड : वाढदिवसाच्या आनंदाच्या क्षणी अचानक वाद विकोपाला गेला आणि त्याचा शेवट गोळीबारात झाला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री देहूरोडमधील गांधीनगर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम रेड्डी (वय २७, रा. देहूरोड) आणि त्याचा मित्र रामकुमार यादव हे गांधीनगर येथे वाढदिवस साजरा करत होते. यादव यांच्या पुतणीचा वाढदिवस असल्याने मित्रमंडळी व नातेवाईक एकत्र आले होते.
दरम्यान, विक्रम रेड्डी आणि काही अज्ञात आरोपींमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि आरोपींनी विक्रम रेड्डीवर गोळी झाडली.
हेही वाचा : Pachora News : कर्मचाऱ्यांकडून मानसिक अन् शारिरीक छळ, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विक्रम रेड्डीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र रामकुमार यादव जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गांधीनगर भागात गस्त वाढवली आहे.