नवी दिल्ली : जगातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती म्हणून चीनची ओळख आहे. शी जिनपिंग यांनी सलग तिसऱ्यांदा चीनची सत्ता सांभाळली तेव्हा त्यांनी आम्ही चीनला एक उच्चस्तरीय सोशालिस्ट सोशालिस्ट मार्केट इकॉनॉमी बनवू, असा दावा केला होता. त्यांनी चीनच्या मूलभूत आर्थिक चौकटीमध्ये सुधारणा करण्याची आणि सार्वजनिक क्षेत्राला भक्कम बनवण्याची आणि बिगर शासकीय क्षेत्राला भक्कम बनवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांच्या नेतृत्वात चीनमध्ये वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या अनेक शहरांमध्ये भयानक मंदी आणि रोखीचं संकट निर्माण झालेलं आहे. त्याचा प्रभाव माणसांबरोबरच प्राण्यांवरही पडत आहे. तसेच जनतेवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या चीनमध्ये जनतेवर जबर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या मार्गातून चिनी सरकार निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. चीनमध्ये परिस्थिती अशी आहे की, येथील रेस्टॉरंटमध्ये विनापरवाना काकडी विकल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्याशिवाय रस्त्यावरील ओव्हरलोड ट्रकांवरही जबर दंड आकारला जात आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार चीनचा उत्तर प्रांत असलेल्या लियाओनिंगमधील डोंगशान पार्कमध्ये रोखीच्या संकटामुळे जनावरांना चारापाणी मिळणं कठीण झालंय. सरकारी खर्चातून चालणाऱ्या या प्राणीसंग्रहालयाला चीन सरकारने पैसे देणं बंद केलंय. गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारही देण्यात आलेला नाही. प्राण्यांच्या भोजनामध्ये ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक भूकेमुळे तडफडत आहेत. तर जनावरांच्या मदतीसाठी भोजन आणि पैसे दान करण्याचं आवाहन केलं जात आहे. जनावरांसमोर निर्माण झालेलं अन्नसंकट पाहून सोशल मीडियावरून मदतीची मागणी केली जात आहे.