जळगाव : सावखेडासिम (ता.यावल) येथून चोपड्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पुलावरून थेट नदीपात्रात कोसळला. ही दुर्घटना वाघोदा गावाजवळ मंगळवारी मध्यरात्री घडली. अपघातात ३२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर २० वर्षीय क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात राकेश जयराम बारेला (वय ३२, रा. छोटी शिरवेल, ता. सेंधवा, जि. बडवाणी) या चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर राधेश्याम गंभीर बारेला (वय २०, रा. बोरअजंटी, ता. चोपडा) हा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एमएच-१९-सीव्ही-११२४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून ऊस वाहतूक सुरू होती. चालक राकेश बारेला आणि क्लिनर राधेश्याम बारेला हे दोघे चोपड्याकडे जात असताना वाघोदा गावाजवळील नदीच्या पुलावर मध्यरात्री हा अपघात झाला. अचानक ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने संपूर्ण ट्रॅक्टरसह ट्रॉल्या पुलावरून थेट नदीत कोसळल्या.
या भीषण अपघातात चालक राकेश बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी क्लिनर राधेश्याम बारेला याला तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जळगाव येथे हलवण्यात आले.
यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या अपघातानंतर यावल पोलिस ठाण्यात दिनकर महाजन यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक राकेश बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.
ही दुर्घटना ऊस वाहतुकीसाठी रात्रीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. संबंधित विभागाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
<