चोपडा : टरबूज भरून जाणारा ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ट्रकखाली दबला गेल्याने क्लिनरचा मृत्यू झाला आहे. साजीद मोहम्मद बागवान (३५, साने गुरुजीनगर, चोपडा) असे क्लिनरचं नाव आहे तर इतर सहा मजूर गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेत ट्रकमधील टरबजूचंही मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साजिद महमद बागवान हा अमजद खान तमीझ खान पठान यांच्या ट्रकवर (एमएच १८ बीए ३४८६) क्लिनर म्हणून काम करत होता. सोमवारी साजीद बागवान हा चोपडा तालुक्यातील वराड शिवारात टरबूज भरण्यासाठी ट्रकचालकासोबत गेला होता. गाडी टरबूजने भरून चोपडाकडे येत असताना ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन उलटला.
या अपघातात क्लिनर साजीद बागवान हा ट्रकच्या केबीनखाली दबला गेल्याने जागीच ठार झाला. तर किरण मोरे (१७), लताबाई सोनवणे (३४), प्रवीण भिल्ल (२०), गणेश भिल्ल (१६), लताबाई भिल्ल (४०, रामपुरा, चोपडा), शफी फारूक बागवान (३४, केजीएन कॉलनी, चोपडा) हे मजूर जखमी झाले. जखमींवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला करुन केबिनच्या खाली दबलेल्या साजीद बागवान याला बाहेर काढलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या अपघातात ट्रक क्लिनरचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतातून टरबूजांनी भरलेला ट्रक घेऊन निघालेल्या मजुरासोबत दु:खद घटना घडली. यात शेतातील शेतमाल, टरबूजांचं मोठं नुकसान झालं आहे. अख्खा ट्रक पलटी झाल्याने सर्व टरबूज रस्त्यावर पसरले असून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.