सोलापूर : बार्शी तालुक्यातील महागाव येथील ढाळे पिंपळगाव तलावात घडलेल्या दुहेरी मृत्यू प्रकरणाचे रहस्य उलगडले असून, पतीच्या खुनाचा कट आखणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. “नवरा गेला, प्रियकरही गेला, आणि आता जेलची हवा” अशी स्थिती आरोपी विवाहितेची झाली आहे.
मयत गणेश अनिल सपाटे (वय २६, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (वय ३५) या दोघांविरुद्ध पांगरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रूपाली हिला अटक करण्यात आली असून, तिच्या पतीचा खून करण्यासाठी तिने प्रियकरासोबत कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
रूपाली आणि तिचा पती शंकर पटाडे (वय ४०) यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही यशवंत नगर, बार्शी येथे वास्तव्यास होते. शंकर हा वाहनचालक होता, तर रूपाली घरकाम करून उदरनिर्वाह करत होते. मात्र, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडथळा ठरला गणेश सपाटे. रूपाली आणि गणेश यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते, आणि याचा शंकर सातत्याने विरोध करत होता. पतीच्या या विरोधामुळे रूपाली आणि गणेशला तो अडथळा वाटू लागला.
शंकरला कायमचा संपवण्याचा कट रूपाली आणि गणेशने आखला. १८ फेब्रुवारी रोजी गणेशने शंकरला दारू पार्टीच्या बहाण्याने बावी शिवारातील एका हॉटेलमध्ये बोलावले. या वेळी गणेशसोबत त्याचे दोन मित्रही होते. सर्वांनी मद्यपान केले आणि शंकर पूर्णतः नशेत गेला. यानंतर गणेश आणि त्याच्या साथीदारांनी त्याला ढाळे पिंपळगाव तलावाकडे नेले.
पोलिस तपासानुसार, मध्यरात्री गणेशने शंकरला तलावाच्या पुलावर नेऊन त्याला पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पडताना शंकरने गणेशला पकडले, त्यामुळे दोघेही तलावात पडले. गटांगळ्या खात असताना पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न दोघांनी केला, पण त्यात अपयश आले आणि दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला.
ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिली होती. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पांगरी पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल श्रीहरी योडके यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आणि तपास सुरू केला. घटनास्थळी पुरावे गोळा करून पोलिसांनी रूपालीची चौकशी केली. तपासादरम्यान तिने खुनाची कबुली दिली.
रूपाली पटाडे हिला अटक करण्यात आली असून, तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या कटात सहभागी असलेल्या गणेशच्या मित्रांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पांगरी पोलीस करत आहेत.