अडावद : जळगाव जिल्ह्यातील अडावद ता.चोपडा येथील मिनाबाई रामेश्वर कोळी यांनी पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरु केले आहे. खोटा गुन्हा दाखल करुन मुलास सोडण्यासाठी पन्नास हजाराची मागणी केली. अरेरावीची भाषा वापरुन अपमानास्पद वागणुक दिल्याचा आरोप या महिलेने केला असून अडावद पोलिस ठाण्याच्या सपोनिसह दोघांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी केली आहे.
चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, दि. १२ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा मयुर रामेश्वर कोळी याचा तलवार प्रकरणात संबध नसताना त्यास अडावद पोलीस ठाण्यात बसवुन ठेवले. सदर बाबीची चौकशी करण्यासाठी दि. १३ ऑगस्ट रोजी मिनाबाई कोळी पोलीस ठाण्यात गेली असता सपोनि गणेश बुवा, पोउनि जगदीश कोळंबे, पो.काँ. सतिष भोई यांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणुक देत पन्नास हजार रुपयांची मागणी केली. अशा आशयाची तक्रार दि. १५ ऑगस्ट रोजी मिनाबाई यांनी चोपड्याचे डिवाएसपी यांच्याकडे केली होती.
सदर बाबतीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा ईशारा देण्यात आला होता. त्याअनुषंगाने सदर प्रकरणात कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे आज दि. ११ रोजी मिनाबाई कोळी यांनी अडावद पोलीस ठाण्याच्या गेटजवळच आमरण उपोषण सुरु केले आहे. सदर बाबतीत सपोनि गणेश बुवा यांचेशी संपर्क साधला असता तलवार प्रकरणी चौकशी करुन योग्य तो गुन्हा दाखल केला असल्याचे त्यांनी सांगीतले.