मुंबई : 1966 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली ती हिंदुत्वासाठी. जेव्हा मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. वडिलांशी बेईमानी करण्याचं, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यानंतर नैतिक अधिकार आज उद्धव ठाकरे यांना नाही. ते उसनं अवसान आणून बोलताहेत, असा हल्लाबोल करत बाळासाहेबांच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आलाय अशा शब्दात रामदास कदम यांनी सुनावलं आहे.
अजितदादा हे जेव्हा सोबत आमदार घेऊन आले ते पण खोके घेऊन आले का? शिवसेना नाव घेण्याचा नैतिक अधिकार रामदास कदम, एकनाथ शिंदे यांना आहे. आमदार गेले, खासदर गेले पण उद्धव ठाकरे यांचा पीळ गेलेला नाही. अडीच वर्षे मातोश्रीत कोंडून घेतलं होतं ते आता विदर्भ फिरताहेत, हे एकनाथ शिंदे यांच्यामुळे. शिवसेनेच्या नेत्यांना संपवून फक्त स्वतः आणि स्वतःच्या मुलाला मोठं केलं, अशी टीकाही कदम यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगावं ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी रामदास कदम आणि त्यांच्या मुलाला संपवण्यासाठी पाच मिटिंग घेतल्या. आदित्य ठाकरे, अनिल परब आणि देसाई यांच्यासोबत बैठका घेतल्या असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मी सांगेन की, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असे रामदास कदम म्हणाले.