---Advertisement---
जळगाव : क्रेनद्वारे जुनी बोगी उचलत असताना क्रेनचा हूक तुटून थेट डोक्यात पडल्याने २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कैलास रमेश माळी (२७, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह.मु, वंजारी खपाट) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ही घटना बुधवारी (१८ जून) रोजी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पार्सल कार्यालयानजीक घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी, ह.मु, वंजारी खपाट येथे कैलास माळी व त्याचा लहान भाऊ हे काका गिरधर माळी यांच्याकडे राहत होते. कैलास हा क्रेनवर काम करायचा. दरम्यान, बुधवारी (१८ जून) रोजी क्रेनचे हुक बोगीमध्ये अडकविले आणि काही वेळातच एका क्रेनचा हूक तुटून तो थेट कैलासच्या डोक्यावर व नंतर गुप्तांगाजवळ पडला. त्यामुळे तो जागीच कोसळला. घटनास्थळी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोउनि राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी पोहचले. कैलासला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले
कैलास व त्याचे दोन भाऊ लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. तिन्ही भावांचा काकांनी सांभाळ केला. दोन वर्षांपूर्वी कैलासच्या भावाचा आजारपणाने मृत्यू झाला व आता कैलासही सोडून गेल्याने त्याचा लहान भाऊ एकटा पडला आहे.
कामाला सुरुवात करतानाच घडली दुर्घटना
पार्सल कार्यालयाजवळ सुरू असलेल्या कामांतर्गत तेथे असलेली एक जुनी बोगी उचलून बाजूला ठेवायची आहे. या बोगीमध्ये कॅण्टीन सुरू करण्याचे नियोजन असल्याने बुधवारी ही बोगी क्रेनद्वारे उचलण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी या ठिकाणी क्रेन लावण्यात आल्या होत्या. कामाला सुरुवात होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने घटनास्थळी सर्वजण घाबरले. त्यानंतर कामगारांनी व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. कामाच्या ठिकाणी शांतता पसरली होती. कैलासव्या जाण्याने पाळधी गावात शोककळा पसरली आहे.