जळगाव : जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहेत. अशाच एका अपघातात, अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार महेश संजय पाटील (वय १८, रा. टहाकळी, ता. धरणगाव) गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान आज, ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
अपघाताची घटना कशी घडली?
महेश आपल्या कुटुंबासोबत टहाकळी येथे राहात होता. तो पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी (NMKC) महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवारी, २३ जानेवारी रोजी कॉलेज सुटल्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला होता. यावेळी गावातील प्रभाकर नामदेव पाटील (वय ४२) हे कंपनीतून दुचाकीवरून घरी जात होते. त्यांनी महेशला सोबत घेतले.
रस्त्यात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बोगद्यातून जात असताना, अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता त्याचा मृत्यू झाला.
नातेवाईकांचा आक्रोश
महेश एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. महेशच्या पश्चात आई छायाबाई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.