कुटूंबासह गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुण नदीत बुडाला, शोधकार्य सुरु

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यात ठिकठिकाणी तलाव व नदींवर श्री गणेशाचे विसर्जनासाठी मंडळ व घरगुती गणेश भक्तांनी गर्दी केली होती. अशाच प्रकारे आपल्या परिवारासह गिरणा नदीवर गणेशाच्या विसर्जनासाठी तरुण गेला होता. त्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. पोलीस पथकाने व त्याच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले. गणेश गंगाराम कोळी (२७, रा. ममुराबाद, ता. जळगाव), असे गिरणा नदीत बुडालेल्या तरूणाचे नाव आहे.

गणेश कोळी हा आई-वडील आणि बहीण यांच्यासोबत गणेश विसर्जनाला गेला होता. कोळी कुटुंब पाळधी-तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली घरगुती गणेश विसर्जनासाठी गेले होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गणेश हा मूर्तीसह नदीत उतरला.

परंतु, त्याला नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज कळाला नाही. यामुळे तो पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी कुटुंबियांनी आरडाओरड केली. परंतु, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणीच त्याला वाचवू शकले नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच ममुराबाद गावातील त्याचे नातेवाईक आणि मित्र मदतीसाठी धाऊन आले. तोपर्यंत तालुका पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

तालुका पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत गणेश कोळी याचा शोध गिरणा नदीच्या पात्रात घेतला. परंतु, धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोध कार्यात बरेच अडथळे आले. रविवारी सकाळी पुन्हा शोध कार्याला गती देण्यात आली. गिरणा काठावरील आव्हाणे, आव्हाणी, खेडी, वडनगरी, फुपनगरी तसेच कानळदा गावालगतच्या किनाऱ्यांवरही त्याचा शोध घेण्यास सुरूवात झाली. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर गरणा धरणात ९६ टक्क्यांवर पाणी साठा झाला आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. ज्यामुळे नदीत सुमारे ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---