---Advertisement---
धुळे : बहिणीच्या विवाह समारंभातील पंगतीसाठी लागणारी काही वस्तू घेण्यासाठी जाणाऱ्या भावाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी शिरपूरच्या सांगवी येथे घडली. रोहित दिनेश थोरात (वय २३) असे या तरुणाचे नाव असून नववधू राणी हिचा तो एकटाच भाऊ होता. या घटनेने विवाह समारंभाचे शोकसभेत रुपांतर झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी रस्त्यावर ही घटना घडली. घटना घडताच कंटनेर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सांगवी येथील दिनेश परशुराम थोरात यांची द्वितीय कन्या राणी हिचा विवाह रविवारी गावातील रमाई नगरात पार पडला. घटनेची माहिती विवाह सोहळ्यात पोहोचताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली, मात्र तोपर्यंत त्यास दवाखान्यात हलविण्यात येऊन जखमी असल्याची माहिती त्याच्या परिवाराला देण्यात आली.
सायंकाळी उशिरा रोहितच्या मृत्यूची बातमी मंडपापर्यंत पोहोचताच आप्त जणांनी एकच हंबरडा फोडला, याबाबत सुरेश परशुराम थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी पोलिसात कंटनेर चालकाविरोधात प्राणांतिक अपघात नोंदविण्यात आला आहे.
---Advertisement---
बाजारपेठेत जाताना काळाचा घाला
दुपारच्या वेळी पंगती सुरू असताना नववधू राणीचा भाऊ रोहित हा महामार्ग ओलांडून नवी सांगवी बाजारपेठेत काहीतरी वस्तू घेण्यासाठी जात होता, त्याचवेळी शिरपूरकडून सेंधवाकडे जाणाऱ्या एचआर ५५ एजे १५८६ कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. त्या धडकेत रोहित गंभीररीत्या जखमी झाला. त्यास उपचारार्थ शिरपूरला उपजिल्हा रुग्णालयात आणत असतानाच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.