तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : यावल शहरातील एका ३३ वर्षीय तरुणाची दलालांमार्फत लग्न लावून देत पाच जणांनी तीन लाख ३७ हजारात फसवणूक केली होती. या गुन्ह्यातील दोन संशयितांना आधी तर आता पुन्हा नाशिक येथील एका दाम्पत्यास पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना १७ फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्यातील नववधूचा शोध पोलिस घेत आहेत.
यावल शहरातील रहिवासी बबलू जयप्रकाश गर्गे (३३) या तरुणास विवाहाकरीता दलालांनी मुलगी मिळवून देतो सांगत त्याची नववधूसह पाच जणांनी ३ लाख ३७ हजारात फसवणूक केली. याप्रकरणी यावल पोलिसात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आधी बर्हाणपूर येथून अशोक सुधाकर जरीवाले (६०) तर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून शीला बाळू सोनवणे उर्फ शीला साईनाथ अनर्थे-पाटील या दोघांना अटक केली होती. याच गुन्ह्यात नाशिक येथून वधूचा भाऊ म्हणून ओळख दाखवणारा प्रकाश जोशी हा मुळ प्रकाश संजय साळुंके निघाला आहे. त्याची पत्नी शारदादेवी संजय साळुंके (रा.नाशिक) या दोघांना पोलिसांनी अटक केली. संशयितंाना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्यासमोर हजर केले असता दोघांना १७ फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.
नववधूच्या शोधात पोलीस
या गुन्ह्यातील संशयीत नववधू माया संजय जोशी हिचे नावदेखील चुकीचे असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे व तिच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्यातील एक वगळता सर्व संशयितांनी आपली खरी नावे लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.