सुसाईड नोट लिहून ट्रॅफिक वॉर्डन तरुणाची आत्महत्या, धक्कादायक उल्लेख..

जळगाव : मेहरूण येथील रामेश्वर कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने आज दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. उमेश एकनाथ ठाकूर (वय ३७) असे मृत तरूणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, माझ्या आत्महत्येला ४ लोक जबाबदार असल्याचे तरुणाने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.

शहरातील मेहरूण येथील रामेश्वर कॉलनीत उमेश एकनाथ ठाकूर (वय ३७) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. आज बुधवार, २६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांचा मुलगा ओम याच्या लक्षात आल्याने समोर आला. मृतदेह पाहून पत्नी व आईने एकच हंबरडा फोडला होता. उमेश वाहतूक पोलिसांकडे ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली.

शेजारी राहणाऱ्या तरूणानी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

सुसाईड नोट लिहून आत्महत्या 
उमेश याने ‘माझ्या आत्महत्येला ४ लोक जबाबदार आहेत. मला वारंवार मानसिक त्रास देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत असतात. तसेच त्यांच्या पासून आमच्या परिवाराला देखील धोका असून म्हणून मी हा निर्णय घेत आहे’ असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.